संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
रा. रं. बोराडे साहित्य नगरी : ग्रामीण व नागरी जिवनाची पुसट होणारी रेषा हा ग्रामीण साहित्या समोरील नवा गुंता असल्याचा सूर मुक्त सृजन साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला. डॉ. डी. एस. काटे यांच्या अध्यक्षतेखाली 'ग्रामीण साहित्य: प्रश्न जुने गुंते नवे' या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले, प्रा.धनंजय गुडसूरकर (उदगीर), प्रा.डॉ. संभाजी पाटील (लातूर), प्रा. डॉ. अर्चना सोनवणे (बिडकीन), डॉ.कैलास इंगळे (पाथरी) यांनी सहभाग घेतला.
प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले यांनी ग्रामीण साहित्याची पार्श्वभूमी सांगून या संदर्भाने निर्माण झालेल्या नव्या गुल्यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील वेगाने होणारे बदल टिकण्यासाठी साहित्यिक व साहित्य विश्व या भागाशी जोडून आहे का? असा सवाल धनंजय गुडसूरकर यांनी यावेळी उपस्थित केला. शहराच्या दृष्टिकोनातून गावाकडे पाहणे हा एक मोठा गुंता असून ग्राम्य जीवनाचा गुंता पाहण्याची दृष्टी नसणे हाच मोठा गुंता असल्याचे मत गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले. शेतीविषयाची अनास्था व कुटुंब व्यवस्थेबरोबरच मूल्यांचे झालेले विभाजन, प्रसार माध्यमाची मोहिनी व बदलाचा वेग यामुळे ग्रामीण जीवनाचा गुंता वाढला असल्याचे मत डॉ. संभाजी पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. लेखकाने ठाम भूमिका घेऊन ही नवी घुसमट फोडण्याची गरज डॉ. इंगळे यांनी प्रतिपादन केली. डॉ. अर्चना सोनवणे यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या प्रश्न संदर्भात मांडणी केली. अध्यक्षीय समारोपात डॉ. डी.एस. काटे यांनी ग्रामीण साहित्यात मोठी ताकद असल्याचे सांगितले
सूत्रसंचालन डॉ.जयप्रकाश चोरघडे आभार डॉ.संतोष देशमुख यांनी मानले.