संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. विजय भोसले, यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. समाजात वाचन संस्कृती रुजविण्याची गरज असून त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. गावोगावी ग्रंथालये व वाचन कट्टे सुरू करणे आवश्यक आहे. असे विचार त्यांनी मांडले.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल क्षिरसागर , उपप्राचार्य डॉ. बी.के. मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचन प्रेरणा दिना निमित्त प्रसिद्ध कवयित्री व विचारवंत डॉ. प्रतिभा अहिरे यांचे वाचनाचे महत्व व वाचनाचे बदलते स्वरूप या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी वाचनाचे महत्व सांगून वाचन प्रत्येकाच्या जीवनात किती आवश्यक आहे हे सांगून वाचनाचे बदलते स्वरूप , वाचनामुळेच आपण घडल्याचे मत व्यक्त केले. ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त दुर्मिळ ग्रंथ व अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ग्रंथाविषयी व अंका विषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी हुसे यांनी केले. तर सूत्रसंचलन डॉ. रामचंद्र झाडे यांनी केले. ग्रंथपाल प्रा. संतोष देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती.