संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुणे : परिस्थिती वेगाने बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीत मुलांना सुसंस्कारीत करण्यासाठी मार्गदर्शक साहित्याची गरज आहे. बाल साहित्यकार संजय ऐलवाड यांचे साहित्य बालकांसह पालकांना दिशादर्शक आहे. असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाड्:मय पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार बाबा भांड यांच्या हस्ते संजय ऐलवाड यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ठाले पाटील बोलत होते. यावेळी मसापचे कार्यवाह दादा गोरे, बाल साहित्यकार डॉ. विनोद सिनकर, बाळासाहेब बोरसे उपस्थित होते.
ठाले पाटील म्हणाले, आजचे बालक उद्याचे वाचक आहेत. त्यामुळे बाल वाचक घडविण्यासाठी समाज आणि निसर्ग व्यवहार शिकविणार्या साहित्याची नितांत गरज आहे. मोठ्यांसाठी लिखान करणार्यांनीही बाल साहित्य लिहिले पाहिजे, तरच लेखक परिपूर्ण होतो. बाबा भांड म्हणाले, मानवी आयुष्यात वाचन संस्कार खुप महत्त्वाचा आहे. भरपूर वाचन म्हणजे आरोग्याचे सर्व्हिसिंग आहे.
संजय ऐलवाड यांनी मनोगत व्यक्त केले. दादा गोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विनोद सिनकर यांनी ऐलवाड यांच्या बालसाहित्यावर भाष्य केले. दासू वैद्य, लिला शिंदे, डॉ. विशाल तायडे, सचिन बेंडभर, रामचंद्र काळुंखे, गणेश मोहिते सदिप भदाणे विश्वनाथ ससे आदी उपस्थित होते. विष्णू सुरासे यांनी सुत्रसंचालन केले. संतोष तांबे यांनी आभार मानले.