संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
द गोदावरी इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व लीपोक फाउंडेशन यांच्या सहकार्याने श्री संत एकनाथ महाराज मंदिर व गोदावरी घाट परिसरात स्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आला. ही मोहीम 22 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता सुरू झाली. गोदावरी परिसर व घाट स्वच्छ करण्यात आला या उपक्रमात आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, व श्रीनाथ हायस्कूल मधील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेष की मध्यंतरी पावसाचा व्यत्यय आल्यावरही विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा ध्यास डगमगला नाही. यासोबतच घाटावर उपस्थित असलेल्या भाविकांचाही मोलाचा सहभाग लाभला. स्वच्छता मोहिमेच्या दरम्यान गोदावरी परिसरातील तसेच घाटाच्या परिसरातील प्लास्टिक, फुलाचा कचरा इत्यादी एकत्र करण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. या भावनेतून पैठण व गोदावरीचे नैसर्गिक व आध्यात्मिक महत्त्व टिकवण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला. या उपक्रमात युवकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संरक्षणात युवकांचा आदर्श उभा केला. याप्रसंगी आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर .बी. रामावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत हा उपक्रम करण्याची गरज काय आहे हे पटवून दिले व कचरा वर्गीकरण साठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले. यावेळी द गोदावरी इनिशिएटिव्ह चे आनंद चिवटे, हर्ष फपाळ, मृणाल वर्मा व कल्पेश मोहोड, श्रीनाथ हायस्कूल एन.सी.सी. विभाग प्रमुख रामनाथ कानडे, आयकॉन पॅराडाईज चे डॉ. जालिंदर येवले, बी .आर. पठाण, सौ. सारिका वरकड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता गोदावरी द गोदावरी इनिशिएटिव्ह च्या प्रतिनिधींनी कचरा व्यवस्थापन, जल प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धन यावर जनजागृती करत कार्यक्रमाची सांगता केली. हा उपक्रम केवळ घाट स्वच्छ करण्यापुरता मर्यादित न राहता पैठणमध्ये युवक, शाळा, संस्था आणि भाविक यांच्या एकत्रित सहभागातून पर्यावरण रक्षणाचा एक प्रभावी संदेश देणारा ठरला.