संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मीना अशोक म्हसे - आसने यांना यावर्षीचा जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेने नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या मीना अशोक म्हसे या विद्यार्थ्यांच्या संदर्भात विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबवत असतात. यात काव्य गायन, विद्यार्थी दिंडी, दहीहंडी उत्सव, गणेशमूर्ती बनवणे, परिसरातील उल्लेखनीय व्यक्तीची मुलाखत, औषधी वनस्पतींची लागवड, परिसरातील सापांची माहिती यांसारखी उपक्रम ते शाळेत सतत राबवत असतात. याशिवाय मंथन, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांचीही तयारीही त्या शाळेत घेतात. मागील जिल्हा परिषद वढू खुर्द शाळेत त्यांनी साठ वर्षातून पहिल्यांदाच शिष्यवृत्तीची परंपरा सुरू केली; ती आजतागायत चालू आहे. तसेच विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीची माहिती होण्यासाठी शाळेत औषधी वनस्पतींची लागवड करून त्याची माहिती विद्यार्थ्यांकडून संकलित करून घेतली. त्या संपूर्ण माहितीचे त्यांनी पुस्तक संपादित केले. या त्यांच्या उपक्रमाला शिक्षण विवेक कडून शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच या पुस्तकावर विविध नामवंत साहित्यिकांनी परीक्षण देखील लिहिले आहे. विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकात त्यांचे नियमित लेखन असते. त्यांचा निरागस मने हा कथासंग्रह प्रकाशकाच्या मार्गावर आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा परिषदेने त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर होताच वाबळेवाडी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.