संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दि. 28 ऑगस्ट 2025 देवगिरी महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ६०० वृक्षांचे वृक्षारोपण सातारा डोंगर येथे केलेले असून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. यामध्ये मेढशिंगी वावळ अजाण - निरगुड, अडुळसा, करवंद, तरवड, फनशी, महारुख, देवबाभूळ, बाभूळ, भोकर, अर्जुन, शिवण, शिरी, पारस, पिंपळ, पाखड, खैर, काळा कुडा, शिसम, शमी या देशी आयुर्वेदिक तसेच अन्य झाडांची लागवड करण्यात आली. देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण पूरक वृक्ष लागवड ही प्रतिवर्षी केली जाते. सातारा परिसरातील शासकीय वनविभागाच्या जागेत ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यास सारख्या डोंगरी भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आज विविध प्रजातीचे वृक्ष लागवड केली. ‘एक स्वयंसेवक एक वृक्ष’ याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहेत. लागवड करण्यासाठी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षांची निवड करून स्वयंसेवकांना स्वयं प्रेरणेने वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. पर्यावरण वाचवायचे असेल तर शहराच्या अवतीभवती डोंगर रांगेच्या परिसरात वृक्ष लागवड किती महत्वपूर्ण आहे याचे महत्त्व देखील स्वयंसेवकांना पटवून दिले जाते. महाविद्यालय कायम निसर्ग संवर्धनात पुढाकार घेते, त्यास मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे वृक्ष लागवड करत आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर हे उदघाटक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना ते असे म्हणाले की निसर्गामध्ये होणारा बदल त्यामुळे पडणारा अनियमित पाऊस यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. सरासरी पाऊस कमी पडत आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो आणि वृक्षारोपण केल्यास तापमानाची वाढ थांबवू शकतो. अशा सामाजिक उपक्रमांमध्ये विध्यार्थ्यांनी सक्रिय पणे सहभागी होऊन देशाच्या विकासामध्ये आपले योगदान दिले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित हा उपक्रम महत्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येकाने वृक्षारोपण करून आपल्या परिसरातील लोकांनाही याबद्दल जागृत करून सामाजिक जवाबदारी पार पाडावी व इतरांना प्रोत्साहित करावे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. इंजि.श्री.रोहित ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ.अनंत कणगरे, कार्यक्रमाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर जावळे, व ५० रासेयोचे स्वयंसेवक उपस्थिती होते.