संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अडथळे, अडचणी आणि संकटे ही येत असतात. परंतु त्या संकटाचे संधीत रूपांतर जो करतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे संकटांकडे नेहमी संधी म्हणून पहा. तुम्हाला यश निश्चित मिळेल, असे मत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी गणेश उत्सवानिमित्त श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी येथे आयोजित व्याख्यानमालेत कवितेच्या प्रांतात डोकावताना या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, प्रवीणकुमार जगताप, विशाल कुंभार, बाळासाहेब गायकवाड, संगीता गवारे, योगिता हरगुडे, शुभांगी जाधव, प्रताप अजने, सागर वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील उपक्रमशील श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी येथे गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. उपक्रमशील शिक्षक प्रवीणकुमार जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफण्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांना कवितेच्या प्रांतात डोकावताना या विषयावर आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कवितेचा प्रवास उलगडला. कविता कशी तयार होते, त्याची पार्श्वभूमी सांगत रोजच्या जगण्याच्या लढाईला कविता कशी बळ देते, हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे खचलेल्या मनाला उभारी देण्याचे काम कविता करते, हे सांगत असताना त्यांनी त्यांच्या येते जगाया उभारी या कवितेचे सादरीकरण केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. त्यानंतर आजोळ, तो विजयाचा स्वामी, कळो निसर्ग मानवा या कवितांचे त्यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता श्री गणेशाची आरती करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणकुमार जगताप स्वागत संगीता गवारे तर आभार मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी मानले.