संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
: (दिंनाक 25) सोनखेड येथे तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.
आज शेतीपेक्षाही जनावरांना, पशु-पक्षी, प्राणी, माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रध्दा, वृध्दाश्रमांची वाढती संख्या, हुंड्यासाठी स्त्रियांचा होणारा छळ, तरुण वर्गात वाढती व्यसनाधिनता नापिकीमुळे, कर्जापायी शेतकरी आत्महत्या करीत आहे,व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्ट्राग्राम यांच्या आहारी जाऊन युवक समाजापासून दूर जात आहे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या ज्वलंत प्रश्नांवर लेखकांनी सशक्त लिखाण करून ग्रामीण जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन लोहा तालुक्यातील सोनखेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून राजेंद्र गहाळ बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विचार मंचावर जनहित साहित्य संमेलनाचे पूर्व संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे, ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी, दिगंबर कदम, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीधर नांदेडकर, डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी बालाजी इबितदार डॉ.कालिदास मोरे, सेवानिवृत्त कॅप्टन संजय कदम, सरपंच प्रतिनिधी संतोष तेलंग स्वागताध्यक्ष सुनील मोरे, उत्तमराव मोरे, ग्रा. पं. सदस्य सोपानराव मोरे, रामकिशन वड, माऊली मोरे, दत्तात्रय फाजगे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ग्रामीण भागापर्यंत पोहचत नाही म्हणून जनहित सारख्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. आज संपूर्ण देश एका विचित्र अवस्थेतून जात आहे. जागतिकीकरण, संगणक, इंटरनेटच्या युगात माणसं अमानुष का वागू लागली , कदाचित त्यांना त्यांच्या आद्य पुरुषांचा विसर पडला असावा. त्यामुळे नव साहित्यिकांनी महापुरुषांच्या साहित्याची व विचाराची बैठक पक्की करुन आधुनिक जगातील प्रश्नांचा धांडोळा घेत उत्तम प्रतिचे मुल्याधिष्टीत साहित्य निर्माण करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रुजावी, मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा, शासन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष गावामध्ये येऊन गावाची परिस्थिती बघावी, मराठी साहित्यातील साहित्यिकांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागामध्ये लेखक, कवी निर्माण व्हावेत आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) या संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीचे हे तिसरे वर्ष होते.
सोनखेड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या जनहित ग्रामीण साहित्य संमलेनामध्ये सुरुवातीला सकाळी ९ वाजता जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिरापासून संपूर्ण गावभर ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन स्वागताध्यक्ष सोनखेडचे उपसरपंच सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या ग्रंथ दिंडीमध्ये टाळकरी,वारकरी मंडळी तसेच गावातील महिला - पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर सकाळी वाजता ११ नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून, दीप प्रज्वलन करून साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय जनहित पुरस्कार २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले
अवकाश भोजनानंतर दुपारी २ ते ४ दरम्यान प्रमाण मराठी भाषेने मायबोलिंना सामावून घावे या विषयावर डॉ. संजय जगताप, प्रा. डॉ.नानासाहेब सूर्यवंशी यांचा अभ्यासपूर्ण परिसंवाद संपन्न झाला. त्यानंतर प्रा. डॉ. शंकर विभुते यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्र संपन्न झाले त्यात, सहभागी कथाकार डॉ. वैजनाथ अनमुलवाड, भारत दाढेल, राम तरटे यांच्या एकाहून एक सरस ग्रामीण कथांचे कथाकथनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता ज्येष्ठ कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील कवी कवयित्रींचे बहारदार कवी संमेलन रंगले. कविसंमेलनाचे सुत्रसंचलन श्रीनिवास मस्के यांनी केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कवी संमेलनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या साहित्य संमेलनातील सर्व सत्रांमध्ये साहित्यिकांनी परिवर्तनवादी आणि ग्रामीण विकासाला गती देणाऱ्या चिंतनशील रचना सादर केल्या. अतिशय आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सोनखेड येथे तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले. प्रास्ताविक राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे यांनी तर आभार आनंद गोडबोले यांनी मानले.
लेखकांनी ज्वलंत प्रश्नांवर लिखाण करावे - संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ
साहित्यिक हे चिंतनशील असतात आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच विकासात्मक प्रश्नांवर साहित्य निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे काम करतात असे चिंतनशील साहित्यिक एकत्र येवून विचारमंथन झाले तर मराठवाड्यातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि अशा जनहित ग्रामीण साहित्य संमेलनातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल त्यासाठी ग्रामीण भागामध्ये अशी साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे मत नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.